जानेवारीतील शाकंभरी नवरात्र

😊आरोग्यदायी शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.🙏🙏

या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता,

नमस्तस्यै नमस्तस्यै या देवी नमो नमः!!

आदिशक्ती देवी दुर्गा हिचे सौम्य मातृ रुपी स्वरूप म्हणजे शाकंभरी देवी होय.

गुरुवार 18  जानेवारी 2024 पासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात. तर अनेक ठिकाणी शताक्षी ही म्हणतात.

शाक म्हणजे भाज्या /वनस्पती

आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली शाकंभरी देवी असे तिचे वर्णन केले जाते.

एका आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी जगदंबा मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे.

या हंगामात पिकणाऱ्या किमान ६० प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो. या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो. राज्यभरातील अनेक मंदिरात देवीला हा भोग लावला जातो.

      देवीला विविध रंगीबिरंगी  फळ भाज्या, पालेभाज्या, फळ इत्यादींपासून बनविलेले अलंकार घातले जातात. 

           या नवरात्रीचा उद्देशच  मुळात हा असतो की फक्त संक्रांत किंवा भोगी दिवशी फक्त भाज्या न खाता हे संपूर्ण दिवस या दिवसात येणाऱ्या ताज्या फळभाज्या,पालेभाज्या ,शेंगांच्या भाज्या तसेच बोरं व व सर्व प्रकारचे फळे खाल्ली जावेत.थंडीमध्ये विविध भाज्या बाजारात उपलब्ध देखील असतात.

या मधून मिळणारे सर्व प्रकारचे  अन्नघटक शरीराची ताकद व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

   पौषपौर्णिमेला देवीला कमीत कमी 60 किंवा 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. खरंतर एवढ्या प्रकारच्या भाज्या किंवा कोशिंबीर बनवण्याची पद्धती हा एक दुर्मिळ पण अभ्यासाचा विषय आहे.

देवीचे नैवेद्याचे निमित्ताने आपण त्या घरांमध्ये आणतो व आहारात समावेश करतो/ केला पाहिजे. प्रसाद म्हणून शेजारच्या ना, नातेवाईकांना देखील खाऊ घातल्या पाहिजे. गरजू लोकांना पालेभाज्या फळं यांचे दान दिले पाहिजे.जेणेकरून आरोग्य उत्कृष्ट ठेवता येईल.

       शाकंभरी देवी ही वनस्पतीची देवी मानली जाते. त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे आणि भाज्या अर्पण करणे महत्वाचे आहे.गरजूंना फळे, भाज्या, अन्नधान्य आणि जल दान करा असे सांगितले जाते.

शाकंभरी नवरात्र : पौष शुद्ध अष्टमीपासून ते पौष  शुद्ध पौर्णिमेपर्यंत. हे विविध प्रकारच्या भाज्या व फळे खाऊन साजरी केली जाते.

तर अशा आरोग्यदायी व प्राणदायिनी शाकंभरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏😊😊😊

आहारतज्ञ शीतल मुदगल