संकल्प आरोग्याचा

काल आमच्या पुणे आहारतज्ञ ग्रुप वर एक अतिशय माहितीवजा छान पोस्ट आली होती. घर कसं समृद्ध ठेवावं. घर भरलेलं असण्यासाठी काही गोष्टी नेहमी वेळेच्या आधी पूर्वी  कशा करून ठेवल्या जायच्या. काही प्रकारची वाळवणं जशी कुरडया, पापड, लोणची लोक करून ठेवत, वेगवेगळे धान्य, डाळी वाळवून त्याची काही पीठ करून ठेवत होते, तसेच हंगामात आलेल्या चांगल्या प्रकारच्या मेथी, हरभरा अशाही भाज्या वाळवून ठेवत ज्या ऐनवेळी बनवता येत. विविध चटण्या बनवून ठेवत ज्या पौष्टिक तर होत्याच परंतु सर्व जण आवडीने खात होते. कदाचित त्यामुळेच आजच्या एवढे घरी बेकरीचे प्राॅडक्टस नसावेत. 

कोणत्याही परिस्थितीचा भडीमार होण्याआधीच काळजीपूर्वक धोक्याचा कंदील दाखवला जायचा. आजही त्याच अन्नधान्या च्या वेगवेगळ्या रेसिपीज पहायला मिळतात. परंतु नुसते वेगवेगळे पदार्थ बनवणे किंवा फक्त चांगला स्वयंपाक करता येणे एवढेच पुरेसे नाही स्वयंपाक शास्त्राला आहारशास्त्राची जोडही  हवीच.

आज जर आपण विचारलं चांगलं आरोग्य म्हणजे काय ?वा आपल आरोग्य कशावर अवलंबून असतं यावर अनेक उत्तरे येतात व सामान्य माणूस आणखीन गोंधळून जातो.

कोण म्हणेल चांगली प्रतिकार शक्ती म्हणजे आरोग्य तर कोणाचं मत असेल चांगली पचनशक्ती म्हणजे आरोग्य, तर कोण म्हणेल योग्य वजन हवं तर कोण म्हणेल जो मनाने निरोगी तो शरीराने निरोगी.

खरंतर सामान्य माणसाचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून झालेला नसतो. प्रत्येक शरीराचे एक स्वतंत्र  गणित असते. त्यामध्ये त्याच्या स्वतःच्या शरीराची ताकद, जैविक घड्याळ, कामाची पद्धत, वातावरण आणि अनुवंशिकता अशा अनेक गोष्टी येतात. ज्यामधून आरोग्य ही व्याख्या जाणार असते.

म्हणूनच आपले आरोग्य जपण्यासाठी आजच्या काळात एकदा तरी योग्य प्रशिक्षित 

आहारतज्ञांकडे जाऊन सल्ला घ्यावा. आज काल आम्ही पण डाएट देतो ,आहारशास्त्र शिकलो आहोत असे म्हणणारे अनेक आहेत. पण ज्यांना कॅलरीज प्रथिने ,विटामिन डी, कॅल्शिअम या शब्दांपेक्षा जास्त अन्नातील रसायनशास्त्र माहित असेल त्यांचा पर्याय निवडावा.कारण धोक्याचे कंदील, तक्रारी यावर उपाय करताना त्याचे रोगांत रूपांतर झाल्यास काय फायदा? कारण नुसतेच प्रथिने मोजलेले  डाएट चार्टस, विविध हेल्थसप्लीमेंट म्हणून  घेतलेल्या गोळ्या, पावडरी अशा प्रयोगांचे तोटे एक दोन महिन्यात कळत नसतात त्याला अनेक वर्षे जावी लागतात.कारण इतक्यात हे कळण्यासाठी आपल्याकडे अजूनही म्हणाव्या तेवढ्या आधुनिक पॅथालॉजी लॅब नाही आहेत.कारण आहारानुसार शरीरात होत जाणारे रासायनिक बदल हा एक खुप मोठा अभ्यास व निरीक्षणाचा विषय असतो.

संधिवात किंवा चयापचय बिघडणे अगोदर इयानिक कॅल्शियम मोजणे किंवा त्याचा विचार करणे आवश्यक असते.

किंवा डिटॉक्स डाएट देताना लिवर बरोबर पित्ताशय व लहान आतडयामधील तयार होणारे एंझाईम्सचा ही विचार करावा लागतो. अशा अनेक गोष्टी असतात. असो येणाऱ्या काही लेखांमध्ये आपण उत्तम आरोग्य संकल्प कसा करता येईल हे पाहणार आहोत.माझ्याकडे येणाऱ्या काही लोकांमध्ये आरोग्याच्या काही खालील प्रमाणे तक्रारी असतात जसे

1) मधुमेह ,हृदयरोग ,संधिवात, कोलेस्टेरॉल ,पाठदुखी,कॅन्सर असे विकार .

२) काही प्रकारच्या वेदना डोके दुखी ,कंबरदुखी, अंगदुखी .

3) वजनांचे प्रश्न असतात जसे अतिलठ्ठपणा ,खूप कमी वजन असणे किंवा व्यायाम -पावडर घेऊनही  वाढलेले वजन .

4) एलर्जी चे प्रकार- गहू न पचणे, सतत शिंका येणे, अंगावर पुरळ येणे ,दम लागणे .

5) सतत थकवा वाटणे ,झोप होऊनही  फ्रेश न वाटणे, हातापायात ताकद नसल्यासारखे वाटणे, काहीच करावेसे न वाटणे .

6) झोपेची तक्रार, पोट साफ न होणे ,ऍसिडिटी, त्वचा कोरडी किंवा काळी पडणे डिप्रेशन मानसिक थकवा गोड किंवा तळलेली खाण्याची सतत इच्छा होणे ,सतत इनफेक्शन होत राहणे.

अशा अनेक तक्रारी आजकाल आपल्याला सतावत असतात. आहार हा आरोग्याचा पाया मानला जातो. चांगल्या आरोग्यासाठी आहारातून मिळणारी मुख्य सात घटक म्हणजे प्रथिने ,कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ,जीवनसत्व ,खनिजे, ऑक्‍सिजन व पाणी यांच्याकडे शास्त्रीय अभ्यासातून पाहू .व  योग्य आहारातून आरोग्य संकल्प कसा करू शकतो हे पाहू.

क्रमशः आहारतज्ञ शीतल मुदगल