पोषण सप्ताह ते पोषण माह( महीना)

मानवी शरीराच्या पोषणात मध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा आहाराचा ही जागृती सर्वसामान्यांमध्ये होण्यासाठी भारतामध्ये 1982 पासून 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पोषण सप्ताह म्हणजेच न्यूट्रिशन वीक साजरा करण्यास सुरुवात झाली. जे शरीर लाखो करोडो पेशींनी बनलेले आहे ती प्रत्येक पेशीसुद्धा आहारातल्या अन्न घटकांवर अवलंबून आहे व ही माहिती सर्वसामान्यांना मिळून निरोगीपणा यावा जागरुकता वाढावी म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो. निरोगी आरोग्य यामध्ये शारीरिक ,मानसिक व बौद्धिक हे तिन्ही आरोग्य आले. निरोगी व्यक्तींचा समाज निरोगी आणि सशक्त असतो.

कुपोषण ही आज जागतिक समस्या असली तरीसुद्धा डब्ल्यू एच ओ चे भारता बद्दलचे विधान विचार करण्यासारखे आहे ते सांगतात की हिंदुस्थानात जन्माला येणार्या दोन कोटी मुलांपैकी फक्त तीस लाख मुले खऱ्या अर्थाने निरोगी असतील. तर 1983 मध्ये भारतातील आहारशास्त्राचे जनक डॉक्टर सी गोपालन यांनीसुद्धा याविषयी सांगितले होते ते त्यांच्याच शब्दात– “1983 सालात जन्माला येणाऱ्या 23 मिलीयन अर्भका पैकी फक्त तीन मिलियन खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण असतील उरलेल्या पैकी जगून वाचून मोठी होतील त्यांची आरोग्य पातळी खालच्या पायरीवरच राहण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम पुढील पिढीवर होणार अशा तऱ्हेने आरोग्याच्या दृष्टिकोनातून सतत खालच्या पातळीवरची प्रजा निर्माण झाली तर त्याचा बोजा समाजावर देशावर पडणार आहे .परकीय आक्रमणा पेक्षा हा धोका जास्त आहे.” कुपोषण हे फक्त उपाशी राहणाऱ्यांमध्येच नसून खाणाऱ्या पिणार्यांमध्येही असते. जिथे अन्नघटक कमी पडतात तिथे कुपोषण हे चालूच होते. केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवांची वाढ आणि ताकद ही आहारावरच अवलंबून असते. आजची बदलते राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती, आहाराच्या परिणामांचे विषयीचे अज्ञान या सर्वांचा परिणाम आजच्या पिढ्यांवर व सामाजिक आरोग्यावर नक्कीच होत आहे. त्यामुळेच वेगवेगळे आजार व औषधे वाढतच चालले आहेत.

आज गेले तीन वर्षापासून आपण पोषण सप्ताह पासून पोषण माह पर्यंत पोहोचलो आहोत. परंतु कुपोषण या शब्दाचा अर्थ मात्र आपण समजून घेत नाही.शरीरात होणारी अन्नघटकांची कमतरता व त्यामुळे होणारे आजार जसे सूर्यप्रकाश मिळाला नाही ड जीवनसत्वा अभावी शरीरात कॅल्शियम कमी पडणार ,अ जीवनसत्व जर कमी पडले तर रातांधळेपणा ,डोळ्यांचे आजार सोबत कॅन्सर यांचेही प्रमाण वाढते, झिंक, सिलेनियम यासारख्या खनिजांचा वापर शरीरात योग्य प्रकारे न झाल्याने वाढणारे मधुमेहाचे प्रमाण , साखर मिठाई मुळे वाढलेले हार्मोन्सचे असंतुलनअशा अनेक गोष्टी माहित असूनही आपलं खाणं मात्र आपल्या सोयीनेच करतो. काहीही खाणं ,खूप खाण, विचार न करता हेल्थ सप्लीमेंट्स घेणे यामुळे होणारे ओव्हर न्यूट्रिशन, लठ्ठपणा हा सुद्धा एक कुपोषणाचाच प्रकार ,तर अनेक पचनसंस्थेचे आजार ऍसिडिटी पासून आयबीएस पर्यंत हेही शरीराचे कुपोषणामुळे झालेले आजार ज्यामध्ये शरीराला खायला मिळूनही त्याचा वापर मात्र करू शकत नाही. खायला न मिळणं किंवा विनाकारण शरीराला चुकीच्या पद्धतीने उपाशी ठेवणे यामुळेही कुपोषणच होतं. हे सर्व जर आपण समजून घेतलं तर आपला आहार बदलने हे आपल्याच हातात आहे हे लक्षात येईल कारण आहार हा केवळ पोट भरणारा नसावा तर पोषण करणारा असावा.