26 जानेवारी 2021 रोजी आपण 72वा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. एकविसाव्या शतकामध्ये आपण तंत्रज्ञान ,विज्ञान, भारतीय बाजारपेठ यांचे जगाच्या इतिहासात स्वतःचे नाव अधोरेखित केले आहे ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या आधारे आज प्रत्येक क्षेत्र अनेक पटीने पुढे गेलेय. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा वेगाने डिजिटलायझेशन चालू आहे. सोबत भारतीय औषध निर्माण शास्त्र ही भरारी घेत आहे. एका अहवालानुसार आपल्या देशातून जगाला एड्स विकारावरील 80% औषधांचा पुरवठा केला जातो. तर अमेरिकेमध्ये खाल्ली जाणारी प्रत्येक तिसरी औषधी गोळी भारतात उत्पादित होते. एवढेच नाही तर जगातील प्रत्येक तिसरे मूल भारतात तयार झालेली लस घेते.
आज भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा प्रगत देश आहे. आणि म्हणूनच आपली आरोग्याची पोषण पातळी व जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न हवेत. आरोग्यमान व कार्यशक्ती सुधारण्यासाठी आपण काही गोष्टींकडे नक्कीच लक्ष देऊ शकतो.
1) संतुलित आहार–तंतुमय धान्य ,डाळी ,भरपूर पालेभाज्या, ताजी फळे अशा योग्य खाद्य पदार्थांची निवड आवश्यक आहे. तसेच आपल्याला आपल्या आहारातील प्रथिनांचे महत्त्व माहीत हवे .प्रथिनयुक्त डाळी, कडधान्य ,मासे,अंडी, दुधाचे पदार्थ आपण खातो का ?किती खातो? याकडे आपले लक्ष हवे. योग्य प्रमाणात संतुलित आहाराबरोबर पाण्याचे प्रमाण योग्य हवे. घेतला जाणारा आहार हा शरीर व मनाचे पोषण करणारा असावा.
2) रोजचा व्यायाम व हालचालींकडे लक्ष द्या.-
रोजची शारीरिक हालचाल होणे गरजेचे आहे ही आपणास सक्रिय ठेवते. सोबत शरीर मजबूत व निरोगी राहण्यासाठी व्यायाम मदत करतो.
हात, पाय ,पाठ व सर्व स्नायूंना बळकट करणारा आंतर इंद्रियांना निरोगी ठेवणारा मन बुद्धीला ऊर्जा पुरवणारा व्यायाम हवा. व्यायामामुळे स्नायू मजबूत होतातच पण शरीराचे व मनाचेही योग्य संतुलन साधते.
4) ताण तणाव दूर ठेवा–
शरीर आणि मन यांना योग्य विश्रांती मिळाली तर तणाव दूर ठेवू शकतो. ताण तणाव कमी करण्यासाठी योग्य संवाद हवा. पुरेशी झोप हवी. तणाव कमी करण्यासाठी संगीत व मेडिटेशनचा उपयोगही करून घेऊ शकतो. तसेच तणावाच्या अतिरेकी काळात या क्षेत्रातील मनोतज्ञांशी जर योग्य वेळी संवाद साधला तर आपल्याला नक्कीच यांचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.
4) नियमित आरोग्य तपासणी व आहार सल्ला घ्यावा–
वेळेवर आरोग्य तपासणी मुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो .तसेच योग्य वेळी धोका कळल्यामुळे अनेक जीवघेणे आजार टाळता येतात. तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक नवीन खाण्यापिण्याची गोष्ट टाळणे कठीण जाते तेव्हा फुड एन्जॉय करण्यासाठी सेन्सिबल इटिंग हा टॉपिक आहार तज्ञांकडून समजून घेता येईल. प्रत्येकाच्या शरीरात नुसार व्यक्तिमत्त्वानुसार आहार बदलतो. शरीराची होणारी झीज टाळण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, मधुमेह, किडनी, हृदयविकार असे अनेक आजार कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य आहार तज्ञांचा सल्ला हवा.
आज मार्केटमध्ये अनेक न्यूट्रासुटीकल्स- हेल्थ सप्लीमेंट्स उपलब्ध आहेत. यांच्या आकर्षक जाहिराती ही खूप जागोजागी पाहायला मिळतात.पण कोणतेही हेल्थ सप्लीमेंट हे शरीराच्या गरजेनुसार व गरजेचे एवढेच वापरायचे असते.
म्हणूनच हेल्थ सप्लीमेंट हे मार्केटिंग कंपन्यांच्या सल्ल्यानुसार घ्यायचे नसतात. तर योग्य आहारतज्ञ अथवा वैद्यकतज्ञांच्या सल्ल्यानुसारच यांचा वापर हवा. शरीर ही जगनिर्मात्याची अमूल्य देणगी असून प्रयोगशाळा नाही हे विसरू नये .
आजच्या काळात आहाराबद्दल किमान मूलभूत ज्ञान आहार तज्ञांकडून करून घ्या. आहार तज्ञांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा आपले औषधी स्वयंपाकगृह जाणून घेऊन व नावीन्य स्वीकारताना आपली संस्कृती जपून आपले निरोगी आरोग्य ही जपता येऊ शकते.
चला तर मग आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना शरीराची व मनाची काळजी घेण्याचे आश्वासन आपण आपल्या भारत मातेला देऊयात.
“जय हिंद”