भाग 2

कुपोषण टाळण्यासाठी ,अन्नाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी पूर्वापार अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म–योग्य आहार योग्य वेळी योग्य पद्धतीने ग्रहण करा हे आपल्या ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेच आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह, जसे खातो तसे दिसतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला माहीतच आहे. कुपोषण मात्र वाढतच चालले आहे. हे आजचे वाढते आजार, औषधांची गरज सांगते. खरंतर प्रश्न जुनाच आहे उत्तर आणि उपाय योजना मात्र नवीन नवीन येत आहेत.

कुपोषण हे ओळखता आले पाहिजे. काही कुपोषण हे रक्ताच्या तपासणीवरून कळते तर काही कुपोषण हे लक्षणांवरून समजते.-जसे पोटाचा घेर वाढलेला असणे, शरीराची त्वचा केस प्रमाणाबाहेर कोरडे असणे, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, अल्सर ,ऍसिडिटी वारंवार पोट बिघडणे ,अशक्तपणा वाटणे झोप न येणे ,कुणाशी बोलू नये असे वाटणे, एकलकोंडेपणा, उदास निराश वाटणे ,आत्महत्येचे विचार डोक्यात येणे, सतत मान -अंग दुखत आहे ही भावना, झोपेच्या तक्रारी ,चिडचिड, दिवसा झोपने, विसराळूपणा, स्टॅमिना नसणे अशी अनेक लक्षणे जी कुपोषणामुळे चालू होतात आणि त्यांचे आजारात रूपांतर होते.

मग हे सर्व कुपोषण टाळायचं कसे?

शरीराला आवश्यक असणारे सर्व अन्नघटक रोजच्या रोज मिळतात का हे पहावे.

जे अन्नघटक कमी पडतात ते योग्य पद्धतीने भरून काढायला हवेत. जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने अन्नघटक मिळतील याची काळजी घ्यायला हवी.

रोजच्या पानातलेच पदार्थ खा. रोजचेच जेवण जेवा पण डोळसपणे- जागरूकपणे काय ताटात कमी पडते हे समजून घ्या. शरीराकडे लक्ष द्या. शरीर जर कुपोषणाच्या लक्षणांची कुरकुर करत असेल तर स्वतःवर प्रयोग न करता योग्य मार्गदर्शनासाठी योग्य आहार तज्ञांचा सल्ला घ्या.

स्वतःचे व कुटुंबाचे कुपोषण टाळा. समाजमन व देश निरोगी व सशक्त बनवा.