(भाग एक)
काल स्वास्थ्यम क्लब मेंबर वहीदा शेख यांचा ‘थँक्स गिव्हिंग डे’ चा मेसेज आला व डिसेंबर चालू झाला याची जाणीव झाली. या वर्षात काय काय अनुभव आले हे विचार येताच , प्रकर्षाने जाणवले 2021 सोडून पुढे जाताना त्या केतकी नावाच्या हिरकणीला विसरणे सोपे आहे का?
तशी केतकीची माझी ओळख अगदी दोन महिन्यांपूर्वीच या दोन महिन्यातही जास्तीत जास्त तीन ते चार वेळाच बोलणे झाले असेल ते ही फोनवरच. पण एक छोटासा धागा नक्कीच तयार झाला.
नऊ दिवसाचे नवरात्र करताना उपवास , पारायण , मौन, माईंड डिटॉक्स असे व्रताचे नियम पाळताना आणखी एक छोटासा नियम माझा असतो तो म्हणजे कोणतीतरी छोटीशी गोष्टीचा खोलवर अभ्यास करणे. जी पहिल्या दोन दिवसात जी कोणती केस असेल तिचा जास्तीत जास्त अभ्यास करणे त्यावर वाचन, मनन, चिंतन.. त्यावरच्या नोट्स काढणे वगैरे वगैरे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नक्की कसली केस येणार याची उत्सुकता आधी चार दिवसांपासून होतीच.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी केतकीचा डाएट कन्सल्टेशन साठी फोन आला व जाणवले हीच ती केस याचा मला आता अभ्यास करायचा आहे.
त्या दिवशी फोनवरून 26 –27 वर्षाची केतकी अगदी सहज बोलत होती . मला माझे एक वर्षाचे बाळ ‘सर्वज्ञ’ याच्या वजन वाढीसाठी डाएट हवाय. बाळ प्रीमॅच्युअर आहे म्हणून वजन कमी आहे, डॉक्टरांनी प्रोटिन्स वाढवायला सांगितलेत व त्याला दुधाची अलर्जी आहे .एवढीच जुजबी माहिती देता देता तिच्या तील सावध आई माझाही अंदाज घेत असावी असे जाणवले. मीही सध्याचे वजन किती? उंची किती? कुठे राहता?असे एक दोन प्रश्न विचारून दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट दिली, कन्सल्टेशन चालू होण्याच्या आधी सर्व रिपोर्ट्स, मेडिसिन ,फाईल एक तास आधी पाठवून द्या असे सांगून फोन ठेवला.
उगीचच जाणवलं ही केस एवढीही सोपी नक्कीच नसणार जरा वेगळीच दिसतेय. मनातच नकळत बाळाच्या ग्रोथ चार्टस चे, आहाराच्या नियमांचे फॉर्मुले, कॅलक्युलेशन्स आठवत राहिले.व
बाळाचे वजन का बरे वाढत नसेल अशा विचारांना बाजूला सारून उद्या पाहू असे म्हटले.