(भाग-3)
सगळंच मन सुन्न करणारं होतं. स्वतःतील 100% घालून मी सविस्तर डाएटप्लान केव्हाच केला होता. पण दोन तास होऊनही केतकीला फोन करणे मीच टाळलं होतं. अजून माझ्या बाळाला चांगलं काय व कसे देता येईल म्हणून ती मात्र आशा लावून बसली होती व बाळाचा आजाराचा सीरियसनेस पाहून बाळाला कोणत्याही क्षणी इमर्जन्सी लागू शकते याची मला काळजी वाटत होती. आणि हे सर्व माहीत असूनही केतकी नावाची हिरकणी मात्र त्याला घेऊन लढायला तयार बसली होती.
शेवटी तिला धीर द्यायचा तिची सकारात्मकता वाढवायची असे ठरवून सहा वाजता फोन केला पूर्ण प्लॅन कसा देता येईल, कोणते अन्नपदार्थ कसे बनवायचे,PEGTUBE मधून कसे द्यायचे ,काय काळजी घ्यायची ,जर जास्त तब्येत बिघडली तर त्याला आणखी काय देता येईल असे सर्व कौन्सिलिंग केले.
आपण आपल्या कडून 101% प्रयत्न करू पण तू बाळाची कंडीशनही पाहतेयस हे सांगताच- आता मात्र तिच्या डोळ्यात एक असहाय्यतेची छटा दिसू लागली .तेव्हा तीने हॉस्पिटल मधूनही DAMA म्हणजेच जबरदस्तीने डिस्चार्जचा निर्णय का घेतला हे सांगितले.
खरंतर नवऱ्यासोबत तिने घेतलेला हा निर्णय योग्यच होता. सर्वज्ञला त्रास कमी व्हावा.
होईल तेवढे जे काही असेल ते शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आपण द्यायचेच .हे तिच्या नवऱ्याचे बोल व दोघांचा प्रयत्न तिने सांगितला. आता मात्र मला सकाळी व्हिडिओमध्ये नकळत दिसून गेलेला तिचा नवरा समोर आला. त्याच्यातील वडील एखाद्या कस्तुरीमृगाप्रमाणे काळजाच्या तुकड्याला जिवाच्या आकांताने जपायला निघाल्यासारखा भासू लागला. तिला धीर देऊन फोन बंद केला .पण मनात एक उदासी होतीच.
सांगितल्याप्रमाणे थोडाफार प्लॅन चालू होतोय तोपर्यंतच पुन्हा तीन चार दिवसातच बाळाची तब्येत बिघडली. एखाद-दुसरा फोन मेसेज चालू होता. रोज बाळाचा चेहरा दिसू लागला. नियतीपुढे माणूस किती केविलवाणा असतो याचा रोज उठून या केसमध्ये मला प्रत्यय येत होता.
पुढच्या वीस दिवसातच सर्वज्ञ तिचं बाळ सोडून गेल्याचा मेसेज आला. नकळत नजर देवघरातील बाप्पाकडे गेली पण काही प्रश्नांची उत्तरे देवाकडे नसतात हेच खरं.
राहून राहून डोळ्यांपुढे केतकी येत होती याही अवस्थेत बाळाचं कौतुक करणारी ,त्याची काळजी घेणारी. गेल्या आठ-दहा महिन्यामध्ये न झोपता फक्त बाळाला अनुभवत होती. तिचं जग फक्त आणि फक्त तिचं बाळ झालं होतं. कशी सामोरी जात असेल ती या प्रसंगाला असं वाटून गेलं. थोड्या दिवसांनी फोन करायचे ठरवलं.
आठ दिवसांपूर्वी केतकीला फोन केला. सर्वज्ञला जाताना कसा त्रास झाला हेच सांगत राहिली. गेल्या वर्षापासून फक्त बाळाच्या ट्रिटमेंटसाठी पुण्यात राहिली होती आता डिसेंबरमध्ये पुन्हा मुंबईला घरी जाणार असल्याचे कळाले. तिचा भरून आलेला आवाज खूप काही सांगून जात होता शेवटी आई ही आईच असते हे कुठेतरी जाणवलं.तिच्याशी पुढे बोलू शकणं मलाच अवघड झालं सांभाळ- काळजी घे म्हणून सांगून फोन ठेवून दिला.