एखाद्या पार्कमधल्या किंवा जत्रेतल्या उंच पाळण्यात मध्ये बसून वर जाताना आजूबाजूला सर्व छोटे छोटे होत जाते आणि क्षणात खाली येताना सर्व जवळ जवळ येत आहे असं वाटतं. मग हे दूर जाणं खरं की जवळ येणं खरं.
जगतो ते की जिथल्या तिथेच असते ते.प्रश्न असतो ,तो जाणे आणि येण्यातील फरक समजून घेण्याचा किंवा त्याच्या मागचे सत्य जाणण्याचा. आजची लाईफस्टाईल अशीच म्हणता येईल. सर्व सुख सोयी ,संधी सुविधा , माहिती मिळूनही माणूस मात्र आजारीच पडत चालला आहे.
सर्व समजत असूनही त्याची प्रकृती कशात तरी विरघळत चालली आहे.
आज प्रत्येक अन्नपदार्थ , व्यायाम, कोणत्याही पॅथी मधील औषध, मेडिटेशन, मनाची सकारात्मकता चांगले कसे? हे सांगण्याची चढाओढ संपतच नाही आहे. पण यांचाच अतिरेक झाल्यानंतर होणारे त्याचे दुष्परिणाम मात्र कोणच सांगत नाही. प्रत्येक अन्नपदार्थाचा फायदा समजून घेताना त्याचा वाईट परिणामाची कल्पनाही हवी.
शरीर आकृतीचाच विचार करायचा झाला तर फक्त वजन वाढणे किंवा वजन कमी असल्यानेच आकृती बिघडते का?
खरे तर ॲसिडीटी, संधिवात, मधुमेह ,ब्लडप्रेशर, ॲनिमिया, किडनीचे आजार, सतत ची काळजी , थायराइड,पाठ दुखी ,मान दुखी ,गुडघे दुखी, हार्मोन्सचे प्रॉब्लेम, थकवा , अपुरी झोप, सततचे इन्फेक्शन अशा अनेक गोष्टींनी आकृती बिघडते.
प्रत्येकाचे शरीर वेगळे, स्वभाव वेगळा पण एकाला लागू झालेले औषध, आहार , मनाची दिली जाणारी थेरपी, एक प्रयोग म्हणून कोणाचे तरी ऐकून किंवा पाहून स्वतः होऊन घेणे किंवा त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला न घेता ,कोणतीही सावधगिरी न बाळगता निश्चिंतपणे दिली जाते तेव्हा मात्र शरीराला दुष्परिणामच भोगावे लागतात.
आर्थिक दृष्ट्या समृद्ध असणे म्हणजे उत्तम लाईफस्टाईल असणं असं नव्हे . आरोग्याचं ज्ञान समजून घेताना त्यावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं भानही हवं. अन्न व विचार आत घेताना त्याचा शरीरावर होणाऱ्या फायद्या बरोबर तोट्याचा ही विचार हवा.
म्हणूनच प्रकृती सांभाळा नाहीतर आकृती बिघडेल.
आपली आकृती बिघडू नये म्हणून योग्य आहार हवा.