मला भेटलेली हिरकणी —

(भाग 2)

दुसऱ्या दिवशी सकाळीच केतकीने बाळाचे रिपोर्टस, ऍडमिशन फाइल ,डिस्चार्ज कार्ड चे फोटो पाठवले .रिपोर्टस- फाईल वाचताना उगीचच बाळ- NICU समोर येऊ लागले .

हे तेरा महिन्याचे बाळ अजून फक्त साडेचार किलोचे कसे दिसत असेल ?त्यात गेले चार महीने पासून PEG TUBE म्हणजे अन्न देण्यासाठी पोटात घातलेली नळी, हे कमी की काय म्हणून ऑक्सिजन सपोर्ट,त्यात एवढी सारी औषधे काय होत असेल त्या चिमुकल्या जीवाचे?

ठरल्याप्रमाणे साडेअकरा वाजता आमचा कॉल चालू झाला. केतकीने सुरुवातीला सर्वज्ञ ठीक होता, नंतर वेस्ट सिंड्रोम व त्याचे गॅस्ट्रिक रिफ्लेक्समुळे कमी होत जाणारे वजन याविषयी सांगितले. व्हिडिओ कॉल मधूनच बाळाला पाहिले. क्षणभर गलबलून आले. नंतर पुन्हा एकदा स्वतःला प्रॅक्टिकल मोडवर आणून मी बाळाविषयी अजून हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली.

आता मात्र मला केतकी मध्ये वेगळीच हिरकणी दिसू लागली. गेल्या सहा-सात महिन्यांपासून बाळाचा आजार- बाळाचा आहार याविषयी ती सांगत होती त्यांला काय खाऊ घातलं नव्हतं- काय केलं नव्हतं तीने बाळासाठी गेल्या सहा महिन्यात. त्या काळात किमान सात ते आठ वेळा बाळाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले होते. औषध नाही असा एकही दिवस गेला नव्हता पण हळूहळू बाळ अशक्त होत गेले होते.

बाळाला वेगवेगळ्या चवी देऊन त्याच्या चेहर्‍यावरची गंमत हावभाव बघण्याच्या वयात या सर्वज्ञला पोटात नळी घालावी लागली होती ,बाळाच्या हसण्याच्या- रांगण्याच्या, बसण्याचा आनंद घेण्याच्या वयात त्याची आई हातापायांच्या पट्ट्या सांभाळत हॉस्पिटलच्या वाऱ्या करु लागली होती. जास्तवेळ या दोघांचा हॉस्पिटलमध्येच जात होता.

ही आई रात्रंदिवस प्रत्येक तासाला चार-पाच चमचे पातळ अन्नपदार्थ पोटातील नळीद्वारे देत होती. प्रत्येक अर्ध्या तासाला बाळाला ताप आहे का ?फिट तर नाही ना आली ? त्याचं काही दुखत तर नाही ना .. हे काळजीपूर्वक बघत होती. रोज वेगळ्याच आशेने -उत्साहाने डॉक्टरांना ती भेटायची. बाळाची रडण्याची ताकदही अतिशय कमी झाली होती.

चार ते पाच महिन्यानंतर बाळाची वाढ झाली नव्हती. बाळाचे रडणे केव्हाच कमी झाले होते.क्षणभरच ते डोळे उघडायचं क्षणभरच अअअ आवाज करे. त्याचा तो आवाज म्हणजेच त्याचे रडणे. पण हे ऐकण्यासाठी त्याला डोळे उघडलेले बघण्यासाठी त्या क्षणासाठी ही आई आसुसलेली असायची. त्याच्याबद्दल सुद्धा तिला कितीतरी कौतुक.

शेवटी आई ती आईच असते बाळाच्या वेदनेला तिच्यापेक्षा जास्त कोण अनुभवू शकेल. त्याला हात पाय हलवायची ताकदच नव्हती पण ते थोडेसे हळूवार उचलताना वेदना मात्र

हिला व्हायच्या. पण त्याला ताकतीसाठी काय काय देते याची लिस्ट मात्र हिची तयार. प्रत्येक औषधाचे नाव पाठ. अर्धी वाटी पेक्षाही कमी अन्न द्यावं लागत होतं तेही बाळ बरे असेल तेव्हाच पण ती प्रत्येक रेसिपी वेगळी. त्याच्यासाठीचा उत्साहही वेगळाच. क्षणभर वाटून गेले कुठून बरं आणत असेल ही एवढे मनोबल. तिला तासाभरात प्लॅन पाठवते सांगून कॉल बंद केला.